भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत द्वारा आयोजित मोर्च्यात १० हजारांहून अधिक शेतकरी रस्त्यावर;
लाखांदूर : (5 ऑक्टो.) धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी साकोली येथे शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला. संत गजानन महाराज मंदिर, शेंदूरवाफा येथून उपविभागीय अधिकारी कार्यालय, साकोलीपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतून हजारो धान उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चामध्ये तब्बल २०० ट्रॅक्टर, २०० ते ३०० चारचाकी वाहने आणि जवळपास ५०० दुचाकी वाहनांसह दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आणि शासनाच्या धोरणांविषयी असलेल्या तीव्र नाराजीचे दर्शन या विराट मोर्चातून घडले.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सन २०२५-२६ चा धान बोनस तातडीने देणे, धानाला प्रतिक्विंटल ₹३५०० भाव मिळावा, शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा करावा, नवीन कृषी वीज जोडण्या तातडीने द्याव्यात, शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम द्यावी तसेच आधारभूत धान खरेदी केंद्रे लवकरात लवकर सुरू करावीत, या मागण्यांचा समावेश आहे. धान उत्पादनासाठी वाढलेला खर्च, मजुरी, खते-बियाणे, कीडनाशके, सिंचन आणि वीज यांचा वाढता बोजा यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत धानाला मिळणारा दर अपुरा असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे धानाला योग्य भाव आणि शासनाकडून मिळणारा बोनस हा शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिक लाभ नसून त्यांच्या उत्पादनाला मिळणाऱ्या न्यायाचा प्रश्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
किसान संघ व अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेच्या विद्यमाने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, साकोली यांच्याकडे सादर करण्यात आले. चारही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखविल्याबद्दल आयोजकांनी सर्व शेतकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
“शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही”, असा निर्धार यावेळी आयोजकांनी व्यक्त केला. शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.







