राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याला दिले निर्देश
गोंदिया : जिल्ह्यातील गोंदिया-तिरोडा आणि गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील नागरा ते रावणवाडी दरम्यान अपूर्ण कामांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात या ठिकाणी तीन चार अपघात घडले असून दहा ते बारा जणांना जीव गमावावा लागला. त्यामुळे वाढत्या अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश खा. राजेंद्र जैन यांनी राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता शास्त्री यांना आज दिले. रावणवाडी – नागरा व तिरोडा मार्गावर घडलेल्या अपघाताची खा. राजेंद्र जैन यांनी गांभीर्याने दखल घेत आज मंगळवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी त्यांनी तिरोडा मार्गावरील उत्तम सावजी जवळील वळणदार अरुंद मार्गामुळे अपघातात वाढ झाली आहे. तसेच गोंदिया-बालाघाट मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. काही ठिकाणी नालीचे खोदकाम करुन ठेवण्यात आले. पण त्या ठिकाणी काम सुरु असल्याचे फलक लावण्यात आलेले नाही. रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे या मार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे.
तसेच नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ आणखी वाढणार आहे. त्यामुळे नवरात्रीपूर्वी या मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, दिशादर्शक फलके, काम सुरु असलेल्या ठिकाणी फलक, रिबीन लावण्यात यावी. तसेच विजयनगर नाला परिसरातील खड्डे जेसीबी लावून त्वरित बुजविण्याचे निर्देश खा. जैन यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.







