समृद्धी महामार्ग, विमानसेवा, रेल्वे प्रश्नांसह शेतकरी कर्जमाफीवर पत्रकार परिषदेत माहिती
गोंदिया, २१ ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार श्री प्रफुल पटेल यांनी रामनगर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत गोंदिया जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प, रेल्वे, विमानसेवा, रस्ते वाहतूक तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सविस्तर माहिती दिली. गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समृद्धी महामार्गामुळे गोंदियाची कनेक्टिव्हिटी मजबूत होणार
मुंबई-नागपूर-गोंदिया समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या महामार्गामुळे गोंदियासह बालाघाट, आमगाव, देवरी आणि कोहमारा परिसराची रस्ते कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांशी गोंदियाची वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि गतिमान होण्यास या महामार्गाचा मोठा फायदा होणार असल्याचे खा. प्रफुल पटेल यांनी सांगितले.
रेल्वे मालधक्का हिरडामालीकडे स्थलांतरित करण्याचे प्रयत्न
गोंदिया शहरातील रेल्वे
मालधक्क्यामुळे अवजड वाहनांची शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे वाहतूक कोंडीसह नागरिक व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन रेल्वे मालधक्का हिरडामाली रेल्वे स्थानकाजवळ स्थलांतरित करण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे. मालधक्का स्थलांतरित झाल्यास शहरातील अवजड वाहनांची वाहतूक कमी होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल.
भीमनगर रेल्वे चौकी परिसरातील उड्डाणपुलासाठी प्रयत्न
भीमनगर रेल्वे चौकी परिसरातील नागरिकांची समस्या लक्षात घेता प्रस्तावित उड्डाणपुलाबाबतही सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. या उड्डाणपुलामुळे रेल्वे वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर तोडगा निघून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा खा. पटेल यांनी व्यक्त केली.
राज्यसभा खासदार श्री. राजेंद्र जैन यांचा संसद रेल्वे समितीत समावेश झाल्याने गोंदियासह संपूर्ण विदर्भातील रेल्वेशी संबंधित प्रश्न समितीसमोर प्रभावीपणे मांडण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या सुविधा, नवीन प्रकल्प, गाड्यांचे थांबे, पायाभूत सुविधा आणि प्रवाशांच्या विविध मागण्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बिरसी विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न
गोंदियाच्या आर्थिक आणि पर्यटन विकासासाठी हवाई कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे. बिरसी विमानतळावरून बंद झालेली विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नांना वेग देण्यात आला आहे. दिवाळीपर्यंत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती खा. पटेल यांनी दिली.
गोंदिया- नवी मुंबई विमानसेवेचा विचार
गोंदिया-हैदराबाद विमानसेवेला अपेक्षित प्रवासी प्रतिसाद मिळाला नसल्याने आता गोंदिया-नवी मुंबई विमानसेवा सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. मुंबई आणि नवी मुंबईशी हवाई संपर्क वाढल्यास गोंदिया जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि पर्यटन क्षेत्राला त्याचा फायदा होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी कर्जमाफी व बोनसचा मुद्दा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना खा. प्रफुल्ल पटेल यांनी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या मागणीसह बोनसच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका लवकरच स्पष्ट होईल, असे सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर चर्चा सुरू असून या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोंदियाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य
गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी रस्ते, रेल्वे, हवाई सेवा, शेती आणि वाहतूक या सर्व क्षेत्रांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि विकासाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. गोंदियाच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ते प्रयत्न पुढेही सुरू राहतील, असा विश्वास खा. प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.







