★ प्रतिकूलतेवर मात करत रंगभूमी गाजवणारा अवलिया कलावंत
लाखांदूर : परिस्थिती कितीही हालाखीची असली, तरी जिद्द आणि कलेच्या जोरावर माणूस यशाचे शिखर कसे गाठू शकतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील सावंगी (ता. देसाईगंज/वडसा) येथील युवराज प्रधान! बालपणी ज्या हातांनी गरिबीचे चटके सहन केले, आज त्याच हातांनी लिहिलेली नाटके संपूर्ण विदर्भात हाऊसफुलचे बोर्ड लावत आहेत. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून पुढे येत, आज युवराज प्रधान यांनी ‘झाडीपट्टीचा युवराज’ म्हणून रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. युवराज प्रधान यांना बालपणापासूनच अभिनय आणि गाण्याची प्रचंड आवड होती. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची, त्यात वडील अल्पभूधारक शेतकरी. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपली कला जिवंत ठेवली. शालेय जीवनातील स्नेहसंमेलनांमधून त्यांच्यातील अभिनेत्याचा आणि गायकाचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पोटापाण्यासाठी आणि कलेची भूक भागवण्यासाठी त्यांनी सुरुवातीला ऑर्केस्ट्रा आणि लग्न समारंभांमध्ये गाणी गाण्यास सुरुवात केली.
★ द्वि-आवाजाची जादू आणि ‘भूक’ नाटकाने मिळवून दिली ओळख.. झाडीपट्टीच्या ‘आराधना नाट्य रंगभूमी’तून त्यांनी खऱ्या अर्थाने व्यावसायिक अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर ‘महाराष्ट्र ललित कला रंगभूमी’वर त्यांनी सहनायक म्हणून काम सुरू केले. युवराज यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते महिला आणि पुरुष अशा दोन्ही आवाजात हुबेहूब गाणी गायचे. प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांचे ‘निसर्ग राजा ऐक सांगतो’ हे गाणे ते हुबेहूब (कट टू कट) सादर करायचे, ज्यामुळे प्रेक्षक त्यांना प्रत्येक अंकानंतर आवर्जून गाणे गाण्याचा आग्रह करायचे. याच काळात त्यांनी ‘किती गुणी माझा वतन’ हे आपले पहिले गाणे लिहिले. पुढे, महाराष्ट्र ललित कला रंगभूमीवर स्व. प्रेमकुमार लिखित ‘संगीत भूक’ या नाटकात त्यांनी सहनायकाची भूमिका साकारली. या नाटकाचा प्रत्येक प्रसंग डोक्यात ठेवून युवराज यांनी ‘ही भूक कशी रे’ हे पार्श्वगीत लिहिले. हे गाणे संपूर्ण विदर्भात तुफान गाजले आणि याच नाटकाने त्यांना मुख्य नायक म्हणून ओळख मिळवून दिली. या गाण्यांचा ‘भूक’ नावाचा अल्बम निघाला आणि सावंगीच्या या युवराजचा आवाज सीडी व कॅसेटच्या माध्यमातून विदर्भातील घराघरांत पोहोचला.
★ ‘खलनायक नको’ ही नवी संकल्पना आणि ‘युवा रंगमंच’ची स्थापना.. सन २०११ मध्ये झाडीपट्टीत काहीतरी नवा बदल व्हावा, या उद्देशाने युवराज यांनी नाटकात ‘खलनायक नसो’ ही अनोखी संकल्पना मांडली आणि स्वतःचा ‘युवा रंगमंच’ हा नाट्यग्रुप स्थापन केला. ‘मुलापेक्षा मुलगी बरी’ या सामाजिक विषयावर त्यांनी ‘संतान’ नावाचे नाटक लिहिले. या नाटकाने संपूर्ण झाडीपट्टी गाजवली आणि आजपर्यंत या एकाच नाटकाचे तब्बल ६०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक सरस नाटके दिली. संतान, मायबाप, आशीर्वाद, लाडका, लेकरं ही त्यांची गाजलेली नाटक त्यात सध्या सुरू असलेले नाटक म्हणजे ‘घास एक मोहमाया’ यासह त्यांचे झाडीपट्टीच नव्हे तर संपुर्ण विदर्भात त्यांचे भूक, भावना मनाच्या, तू चांदणी हे गाण्यांचे अल्बम गाजले आहेत.
★ नवोदित कलावंतांसाठी ठरले मार्गदर्शक..
युवराज प्रधान यांनी केवळ स्वतःचेच नाव कमावले नाही, तर आपल्या ‘युवा रंगमंच’च्या माध्यमातून विदर्भातील ग्रामीण भागातील अनेक नवोदित कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण कलावंत रंगभूमीवर उदयास आले असून नाव कमावत आहेत. गरिबीवर मात करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या झाडीपट्टीच्या या ‘युवराज’चा हा प्रवास नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.








