लाखांदूर :- बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूर व नागवंश बहुउद्देशीय संस्था, नागपूर कडून बहुजन विद्यार्थी संघाच्या 23 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या 79 व्या वर्धापन दिवशी 15 ऑगस्ट 2026 शनिवारला बोरकर सभागृह लाखांदूर येथे आयोजित केलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम मान.अनिल काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आनंदात व शांततेत संपन्न झाला. अध्यक्षीय भाषण करताना मान. अनिल काणेकर, अध्यक्ष बहुजन प्रबोधन मंच व नागवंश बहुउद्देशीय संस्था, नागपूर ,म्हणालेत की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतांनाच फुले -शाहू -आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे. स्वातंत्र्य, समता व बंधुता या लोकशाही मार्गाने जीवन जगण्याचे सर्वांना सारखे अधिकार कोणतेही धर्मग्रंथ देत नसून फक्त आपल्या “भारताचे संविधान” देतो. म्हणून संविधानातील मूलभूत हक्कासोबतच मूलभूत कर्तव्याचे पालन करावे व जीवनात नैतिकतेला तसेच तर्कसंगत वर्तणुकीला महत्त्व द्यावे.
यावेळी मान. विनोद ठाकरे, नगराध्यक्ष, लाखांदूर, जे विद्यार्थी परिस्थितीचे रडगाणे न गाता त्यावर मात करतात तेच यशस्वी होतात असे सांगितले. मान.रज्जू पठाण नगरसेवक, यांनी साधू व विंचू यांची गोष्ट सांगून विद्यार्थ्यांनी आपले अभ्यासाचे काम सतत करत राहिण्यास सांगितले. मान. संकेत दहिवले, नागपूर, यांनी कोणत्याही विषयाच्या बेसिक संकल्पना विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे समजून घेण्यास सांगितले. उद्धव रंगारी, लाखांदूर, से.नि. प्राचार्य, म्हणालेत की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाची चांगली सवय लावावी.आता मिळविलेले यश पूढेही टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, असे अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्या विहार मंदिरचा रौनक मेश्राम SSC,श्री गुरुदेव मंजुळा माता विद्यालयची दिशा नाकतोडे SSC, शिवाजी विद्यालयातील दर्शिका साठवणे SSC व निधी केशव गाडेकर HSC विज्ञान, जि. प. विद्यालय व कनिष्ठ महा.तील अनुष्का दिघोरे SSC, अंकित अलोणे HSC विज्ञान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्या. व कनि. महा.तील योगिनी प्रधान SSC, चेतन गोठे HSC विज्ञान, व प्राजक्ता जांभुळकर HSC कला, श्री सेवकभाऊ वाघाये पाटील कनि.महा.तील साहिल कापगते HSC विज्ञान व श्रुतिका बनसोड HSC वाणिज्य, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील आचल भोपे B. A., अभिषेक सावसाकडे B.Com., समीक्षा धोटे B Sc.आणि गीताचार्य तुकारामदादा महाविद्यालयातील अभिषेक गजभिये B.A. व हर्षद रंभाड B Sc. हे विद्यार्थी आपापल्या शाळेतून सर्वप्रथम आल्याबद्दल सर्वांना गुलाबपुष्प, सन्मानपत्र व ग्रंथ भेट पाहुण्यांचे हस्ते देण्यात आलेत तसेच तुषार कालिदास राहिले,HSC विज्ञान, जि.प.विद्यालय व कनिष्ठ महा. हा लाखांदूर टॉपर असल्याने ₹1000/ अनिल काणेकर पारितोषिक व सिद्धार्थ एच एस सी व्होकेशनल (MCVC) कनिष्ठ महाविद्यालयातील छबीला देवेंद्र कोहरे HSC हार्टिकल्चर सर्वप्रथम असून हिला व प्रणय रवींद्र सुखदेवे या दोघांनाही इंग्रजी विषयात सारखे गुण प्राप्त झाल्यामुळे सिद्धार्थ ज्यू. कॉ. इंग्रजी विषय टॉपर ₹1000/ अनिल काणेकर पारितोषिक विभागून देऊन गुलाबपुष्प, सन्मानपत्र, ग्रंथ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अभिषेक सावसाकडे व दर्शिका साठवणे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संचालन मान.अमर प्रधान, प्रास्ताविक मान.प्रदीप भावे व आभारप्रदर्शन मान. शिवकुमार खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुजन विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.








