लाखांदूर, दि. २७ जुलै : लाखांदूर तालुक्यातील मौजा बोथली (नवीन /जुनी ) व धर्मापुरी येथे अतिसार व वमनाच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, या गंभीर परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवून प्रभावी आरोग्यविषयक उपाययोजना राबविण्याची मागणी बहुजन समाज पार्टी, तालुका लाखांदूरयांच्या वतीने करण्यात आली आहे.बसपा लाखांदूर तालुकाध्यक्ष चेतन नेपाल बोरकर यांच्या नेतृत्वात मा. तहसीलदार वैभवजी पवार साहेब , लाखांदूर यांच्यामार्फत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन मा. जिल्हाधिकारी, भंडारा, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, मा. जिल्हा शल्यचिकित्सक, मा. तालुका आरोग्य अधिकारी, लाखांदूर तसेच मा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती लाखांदूर यांच्याकडे आवश्यक कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, बोथली व धर्मापुरी येथे अतिसार व वमनाच्या साथीमुळे अनेक नागरिक बाधित होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने विशेष वैद्यकीय पथक पाठवून आरोग्य शिबिरे आयोजित करावीत, बाधित रुग्णांवर मोफत उपचार करावेत, आवश्यक औषधे, ओआरएस व सलाईनचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासावी तसेच जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण व विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.याशिवाय आरोग्य विभागाने घरोगरी सर्वेक्षण करून बाधित नागरिकांची नोंद घ्यावी, नागरिकांमध्ये स्वच्छता व सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत व्यापक जनजागृती करावी तसेच साथीवर पूर्णपणे नियंत्रण येईपर्यंत नियमित देखरेख ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष आयु. चेतन नेपाल बोरकर यांनी प्रशासनाने या गंभीर आरोग्यविषयक परिस्थितीची तातडीने दखल घेऊन कोणतीही दिरंगाई न करता प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार असल्याचे सांगितले. साथीचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व प्रशासनाने समन्वयाने काम करून नागरिकांना त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.बहुजन समाज पार्टीने नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. निवेदन सादर करतेवेळी साकोली विधानसभा प्रभारी सोपान दिवठे,कोषाध्यक्ष स्वागत मेश्राम, तालुका उपाध्यक्ष कामेश सूर्यवंशी, अधीर आखरे,नितीन मेश्राम, मनीष बन्सोड, प्रमोद बारसागडे, अरविंद भोयर,डाकराम देशपांडे, प्रफुल कोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.








