*प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; निधीअभावी रखडलेल्या योजनांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवा – पालकमंत्रींचे निर्देश*
गोंदिया: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री श्री इंद्रनील नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गोंदिया जिल्हा परिषद व गोंदिया नगर परिषदेच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी खासदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले, संबंधित विभागांचे अधिकारी, नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या भागातील विविध समस्या, विकासकामांतील उणिवा, निधीअभावी रखडलेली कामे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा पाढा पालकमंत्र्यांसमोर मांडला. त्यावर पालकमंत्री श्री इंद्रनील नाईक व खासदार श्री राजेंद्र जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावून विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले. तसेच निधीअभावी रखडलेल्या कामांचे प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीत गोंदिया शहरातील मागील सात वर्षांपासून रखडलेल्या (अडिटोरियम) सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित झाला. निधी उपलब्ध असूनही तांत्रिक कारणांमुळे काम रखडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावर फेरनिविदा (री-टेंडर) प्रक्रिया पूर्ण करून काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
याशिवाय मुख्य बाजारपेठेचे स्थलांतर, गोंदिया शहरातील ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची उभारणी, नगर परिषदेच्या शाळांच्या इमारतीचे बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा व निधी उपलब्ध करून देणे, जुन्या नगर परिषद इमारतीचे बांधकाम करून नवीन प्रशासकीय इमारतीस मंजुरी व निधी देणे आदी महत्त्वाच्या मागण्या बैठकीत मांडण्यात आल्या. या सर्व प्रस्तावांवर सकारात्मक कार्यवाही करून नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलावीत, असे निर्देश पालकमंत्री नाईक, खासदार राजेंद्र जैन व आमदार राजकुमार बडोले यांनी दिले.दरम्यान, जिल्हा परिषद सदस्यांच्या समस्याही पालकमंत्री नाईक यांनी जाणून घेतल्या. गृहनिर्माण विभागातील स्थापत्य सहाय्यकांची संख्या कमी करण्याच्या प्रस्तावामुळे प्रधानमंत्री आवास व इतर घरकुल योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे कर्मचारी कमी करण्याऐवजी त्यांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली. तसेच आरोग्य व शिक्षण विभागात निधीअभावी सेवांवर परिणाम होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. कटंगी कला येथे आदिवासी समाजाचे क्रांतीपुरुष स्वर्गीय नारायणसिंह उईके यांचा पुतळा उभारण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
बैठकीअखेर पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत आणि जनतेच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश दिले.








