केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीतील आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा
प्रतिनिधी, लाखांदूर :
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून, त्याच्या निषेधार्थ आज लाखांदूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तसेच TET पेपर फुटी प्रकरणी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे अभिजित दिपके व सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा जाहीर करण्यात आला.यावेळी शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरण तसेच देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरून त्यांना पदावरून हटविण्यात यावे, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, टीईटी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर कारवाई करावी, दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित मारहाणीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच आंदोलनस्थळी वीज, पाणी व अन्नपुरवठा रोखणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार, लाखांदूर यांच्या मार्फत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले.या आंदोलनात नरेश दिवटे, चंद्रशेखर टेम्भूर्णे, सुरेश ब्राह्मणकर, विनोद ढोरे, मंगेश राऊत, अनिल कान्हेकर, होमराज डोये, प्रकाश बारसागडे, निरुताई मेश्राम, संदीप मोटघरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.








